कंपनीतील कामगारांना लुटणारी टोळी पकडली   

पिंपरी : कंपनीतून घरी जात असलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी अडवून लुटणार्‍या चार जणांच्या टोळक्याला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. टोळक्याकडून मोबाईल फोन, दुचाकी, ऑटो रिक्षा असा २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कृष्णा सुभाष सौराते (वय १९, रा. वाघजाई नगर खेड), भीमराव ज्ञानोबा मुंडे (वय २१, रा. नाणेकरवाडी खेड), दीपक विनोद भगत (वय २४, रा. वाघजाई नगर खेड), ऋषिकेश अर्जुन माळी (वय २१, रा. नानेकरवाडी खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार प्रदीप बबन जाधव आणि धीरज अंबोरे यांचा शोध सुरू आहे. 
११ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जितेंद्र वायदंडे हे कंपनीतून घरी जात होते. महाळुंगे येथे निर्जन ठिकाणी त्यांना काही लोकांनी अडवले आणि मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन आणि दुचाकी चोरून नेली.
 
याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न केले आणि चौघांना नाणेकरवाडी येथून अटक केली.आरोपींकडून दोन दुचाकी, मोबाईल फोन, ऑटोरिक्षा असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पाच तर चाकण पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला, सहायक उपनिरीक्षक राजू जाधव, राजू कोणकेरी, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, मंगेश कदम, राजेंद्र गिरी यांनी केली.

Related Articles